सभापती पदाकरिता भाजपमध्येच रस्सीखेच; दोन भाजप नगरसेवकांनी दाखल केले अर्ज

Foto
औरंगाबाद: स्थानिक सत्तेचे केंद्र मानल्या जाणाऱ्या महानगरपालिकेतील अर्थपूर्ण समिती असलेल्या स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक 4 जून रोजी पार पडणार आहे. याकरिता शनिवारी अर्ज स्वीकारण्यात आले.

लोकसभा निवडणुकीतील कामावरून युती  तणाव व आलेला निकाल पाहता. शिवसेनेकडून युती धर्माला फाटा देऊन दगाफटका होण्याची भीती भाजपाच्या गोटात होती. प्रत्यक्षात मात्र, झाले उलटेच भाजपा मध्येच सभापती पदाच्या उमेदवारीवरून चांगलचं नाट्य रंगले पाहायला मिळाले.  इकडे राजू शिंदे तर दुसऱ्या बाजूने जयश्री कुलकर्णी यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्याने दोघांपैकी कुणी माघार घेणार का? की तिरंगी लढत होऊन सभापती पदाकरिता रस्सीखेच होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे.
 
महापालिकेत सेना-भाजप युतीची सत्ता असून, युतीमधील करारानुसार अर्थपूर्ण समिती मानल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभापती पद यंदा भाजपच्या वाट्याला आले आहे.असे असताना नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भाजपच्या काही नगरसेवकांनी शिवसेनेचे उमेदवार असलेले चंद्रकांत खैरे यांचे काम केले नसल्याचे बोलले जाते. या निवडणुकीत खैरे यांचा पराभव झाल्याने शिवसेना देखील स्थायी समितीच्या निवडणुकीत दगाफटका करते काय याबद्दल भाजपच्या गोटात धाक-धुक कायम होती. शनिवारी तासाभराच्या चर्चेनंतर पहिले राजू शिंदे पाठोपाठ जयश्री कुलकर्णी यांचा अर्ज सभापती पदाकरिता दाखल करण्यात आला. यानंतर कुलकर्णी या भाजपच्या अधिकृत उमेदवार असल्याचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी सांगितले. त्यामुळे सभापती पदाच्या शर्यतीत भाजपकडून कुलकर्णी आणि शिंदे तर एमआयएम कडून नासिर सिद्दिकी असे तीन उमेदवार आहेत. यात भाजपचे दोन सदस्य उमेदवार असल्याने यापैकी कुणी माघार घेणार का ? की  तिरंगी लढत होणार अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे. अशा परिस्थितीत भाजपसमोर  मात्र पेच वाढलेला असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. 


या आहेत दोघांच्या जमेच्या बाजू......
उमेदवारी दाखल करण्यात आलेल्या शिंदे व कुलकर्णी यांच्या बाबतीत विचार केल्यास शिंदे हे हरिभाऊ बागडे यांचे तर जयश्री कुलकर्णी यांचे पती सुरेंद्र कुलकर्णी शहराध्यक्ष तनवानी यांचे निकटवर्तीय समजले जातात. अशा परिस्थितीत  दोन वेळा सभापती पद भूषविन्याचा अनुभव, शिवसेनेवर वचक ठेवण्याची ताकद या शिंदे यांच्या जमेच्या बाजू आहेत तर कुलकर्णी यांचे पती सुरेंद्र यांची शिवसेनेतील पदाधिकाऱ्याशी असलेली जवळीक यासह पक्षाच्या अधिकृत उमेदवार, तसेच स्थायीचे सभापती पद हे पुरुष प्रधान राहिलेले आहे. कुलकर्णी यांच्या उमेदवारीने हे पद महिलांच्या वाट्याला येऊ शकते. या कुलकर्णी यांच्या जमेच्या बाजू आहेत. अशा परिस्थितीत 4 जून रोजी दोघांपैकी कुणी माघार घेणार काय? याबाबत सर्वत्र उत्सुकता लागलेली आहे. 

शिवसेनेलाही वचपा काढण्याची संधी...
लोकसभा निवडणुकीत काही भाजप नगरसेवकांनी शिवसेनेचे उमेदवार खैरे यांचे काम केले नसल्याचे खुद्द खैरे यांनी जाहीरपणे सांगितले होते. या निवडणुकीत अतिशय कमी फरकाने खैरे यांचा पराभव झाला. अशा परिस्थितीत शिवसेनेने युतीधर्माला फाटा देऊन ही निवडणूक लढवावी आशि स्थानिक पदाधिकारी यांची इच्छा होती. परंतु वरिष्ठ स्तरावरून युती धर्म पाळण्याचे संकेत मिळाले असल्याचे समजते. भाजपचा दोन सदस्यांनी सभापती पदाकरिता उमेदवारी अर्ज दाखल करणे,त्यात अधिकृत सदस्यकरिता शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार शिवसेनेच्या सदस्यांनी ऐनवेळी धावपळ करीत येऊन सूचक, अनुमोदक म्हणून स्वाक्षरी करणे या सर्व घटनाक्रमामुळे ही शिवसेनेची खेळी असल्याचेही बोलले जात आहे. तिरंगी लढत झाल्यास शिवसेनेला देखील लोकसभेतील पराभवाचा वचपा काढण्याची संधी आलेली असल्याचेही चर्चा सध्या एकायला मिळत आहे.